गलवान खोर्‍यावर ‘ड्रॅगन’चा अधिकार नाही, चीन सरकार चुकीचा दावा करतेय : तिबेटचे PM

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिबेटचे निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग सांगेय यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, गलवान खोऱ्यावर चीनचा अधिकार नाही. जर चिनी सरकार असा दावा करत असेल तर ते चुकीचे आहे. गलवानलाच लडाख हे नाव देण्यात आले आहे. तर मग अशा दाव्यांना अर्थ राहात नाही, असे सांगेय यांनी म्हटले आहे. पंतप्रधान लोबसंग सांगेय म्हणाले, की अहिंसा हीच भारताची परंपरा असून तिथे ती पाळली जाते. त्याच वेळी चीन अहिंसेबद्दल बोलतो मात्र त्याचे अनुकरण करत नाही. चीन हिंसाचाराचे अनुसरण करतो. याचा पुरावा म्हणजे तिबेट. हिंसाचाराच्या जोरावरच चीनने तिबेट ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या वादाला सामोरे जाण्यासाठी सांगेय म्हणाले की, तिबेटला आता झोन ऑफ पीस बनावे लागेल. दोन्ही सीमा सैन्यमुक्त झाल्या तरच या ठिकाणी शांतता राहील. भारत आणि चीन दरम्यान तिबेट आहे आणि तिबेटचा प्रश्न मिटेपर्यंत तणावाची परिस्थिती राहू शकते. ते पुढे म्हणाले की, चीनला आशिया खंडातील एक नंबरचा देश बनायचे आहे. आशियात चीनाला भारत, इंडोनेशिया आणि जपान हे देश स्पर्धक आहेत. यामुळे तो हाताच्या पाच बोटांनी (लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, नेपाळ, भूतान) यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

यापूर्वी चीनने डोकलामध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न केला. आता लडाखमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे नेपाळचे भारताशी असलेले संबंधही काहींसे बिघडले आहेत. पंतप्रधान सांगेय म्हणाले की, चीनला आर्थिक आघाडीवर धडा शिकवला जाऊ शकतो. परंतु आपल्याला राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक हितापासून निवड करावी लागणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सगळ्यात अव्वल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही करार रद्द करून चिनला योग्य तो संदेश दिला आहे. भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या व्यापारातून चीनला दुप्पट, तिप्पट फायदा होत आहे. अशा परिस्थितीत हे व्यापाराच्या नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो, असे सांगेय यांनी म्हटले आहे.