पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे संविधान धोक्यात: शरद पवार 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या  मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींमुळे संविधान धोक्यात असल्याचे वक्तव्य केले आहे.

गुजरात मधील गोध्रा हत्याकांड विषयी बोलताना पवार म्हणाले,  ज्यावेळी गोध्रा हत्याकांड झाले त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे काम सांभाळत होते. पण धक्कादायक बाब अशी की, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांचीच हत्या झाल्याचे चित्र होते असे पवार म्हणाले.

याबरोबरच ते म्हणाले, आंबेडकरांच्या संविधानाबाबत गोळवरकर गुरुजींनी  एका पुस्तकाच्या माध्यमातून टीका केली होती. भाजप पक्ष म्हणजे गोळवरकर गुरुजींच्या  विचारांवर चालणारा पक्ष. त्यामुळे संविधानाबाबत भाजपकडून कितीही चांगली वक्तव्ये  होत असली तरी ती धादांत खोटी असल्याची टीका पवारांनी केली.

यावेळी इंदिरा गांधी यांचा दाखला देत इंदिरा गांधींप्रमाणे जनता मोदींनाही धडा शिकवतील असा इशारा पवारांनी दिला. इंदिरा गांधी यांनी गोरगरीबांसाठी खूप काम केले. पण त्यांनी जेव्हा संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा याच जनतेने इंदिरा गांधींसारख्या मोठ्या नेत्याला हि धडा शिकवला. त्यामुळे आता मोदींनाही जनता धडा शिकवेल असे पवार म्हणाले.