जळगाव विमानतळावर मोदींचे चोरून चित्रीकरण, सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असताना जळगाव विमानतळावर त्यांच्या आगमनाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून काही जणांनी मोदी यांच्या आगमनाचे चोरून चित्रीकरण केले. विशेष म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी आणि जळगाव पोलीस यांचा बंदोबस्त असताना देखील अशा पद्धतीचे चित्रीकरण होणे म्हणजे यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हा व्हिडीओ तब्बल ३ मिनिट ५७ सेकंदांचा आहे. या व्हिडीओवरून हा व्हिडीओ जवळपास २०० मीटर अंतरावरून  घेतला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्हिडीओ तयार करणाऱ्यांमध्ये संवादही सुरु आहे. मोबाईल व्यवस्थित घ्या, वर घेऊ नका..स्वप्नील भाऊ कोणाला त्रास व्हायला नको.. गडकरी साहेब आले..फडणवीस साहेब भी आहे रे भो… अरे मोदी साहेब येताहेत अजून… राज्यपाल साहेब येतात… मोदी साहेब नाहीत… दिसलं का रे पगारे भाऊ… अजून दिसलं नही तुले… काळ्या कपड्यावर दिसत नाही का तुले… बरं… बरं… एन्ट्री होतेय… राज्यपालांच्या बाजुला आमदार, एस. पी. साहेब… असे म्हणत असतानाच मोदी विमानातून बाहेर येतात… तेव्हा आला रे बाप… टायगर आला टायगर असे संवाद या व्हिडीओत आहेत.

अशी होती सुरक्षा यंत्रणा – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह इतर मंत्री शनिवारी धुळे दौऱ्यावर होते. त्यासाठी विमानाने ते जळगावात दुपारी १.५० वाजता दाखल झाले. पंतप्रधानांना असलेली कडक सुरक्षा पाहता एक दिवस आधीच राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने विमानतळाचा ताबा घेतला होता. त्याशिवाय हजारो पोलीस, कमांडो, अधिकारी तैनात करण्यात आले होते. असे असताना सुरक्षा यंत्रणेचे कसे धिंडवडे उडविले जातात, याचा व्हिडीओ वायरल झालेला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सुरक्षा यंत्रणेला मोठे आव्हान या व्हिडीओने निर्माण केलेले आहे.

दरम्यान हे व्यक्ती कोण  होते ? याची अद्याप माहिती मिळाली नाही. पण हे व्यक्ती इतर कुणी नाही तर स्थनिकच असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कडक सुरक्षा व्यवस्था भेदून हा व्हिडीओ काढण्यात आल्यामुळे मात्र सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.