100 रुपये ठेवा अन् बिनधास्त ‘कॉप्या’ करा, मुख्याध्यापकाच्या विद्यार्थ्यांना ‘टिप्स’ (व्हिडीओ)

लखनऊ (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – सध्या बोर्डाच्या परिक्षा सुरु असून या परिक्षेदरम्यान कॉपी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहे. असे असताना देखील कॉप्या करण्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत आहेत तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक कॉप्या पुरवतानाचे व्हिडीओ समोर येत आहेत. कॉपी करताना मदत करतानाचा व्हिडिओ महाराष्ट्रातून देखील समोर आला आहे.

यावर कळस म्हणजे एका मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना शंभर रुपये द्या आणि बिनधास्त कॉप्या करा, असा सल्ला दिला आहे. एवढेच नाही तर जर कॉपी करताना पकडले गेलात तर काय करायचं याच्यादेखील टिप्स या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊमधील एका खासगी शाळेतील असून एका विद्यार्थ्यांने हा व्हिडिओ शूट केला आहे.

उत्तर प्रदेशात मंगळवारपासून माध्यमिक मंडळाच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी पैशांची मागणी मुख्याध्यापकच करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. लखनऊमधील खासगी शाळेचे उपप्राचार्य प्रवीण मल यांचा हा व्हिडिओ आहे. प्रवीण मल हे पालकांसमोर विद्यार्थ्यांना कॉपी कशी करावी हे सांगत आहेत. एका विद्यार्थ्याने हा व्हिडिओ उत्तर प्रदेश सरकारच्या तक्रार दाखल करण्याच्या पोर्टलवर अपलोड केला आहे. यानंतर या प्राचार्याला अटक करण्यात आली आहे.

प्राचार्यांनी काय दिल्या टिप्स ?
व्हायरल झालेला हा व्हिडिओ दोन मिनिटांचा आहे. यामध्ये प्राचार्य विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणतात, मी निश्चितपणे सांगतो की, माझा कोणताही विद्यार्थी नापास होऊ शकत नाही. परीक्षेदरम्यान तुम्ही एकमेकांशी बोलू शकता आणि पेपर लिहू शकता. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. तुम्ही घाबरू नका. तुम्ही ज्या शाळेमध्ये सरकारी परीक्षा देणार आहात तेथील शिक्षक माझे मित्र आहेत. जर तुम्ही पकडला गेलात आणि कुणी तुम्हाला मारलं तर घाबरू नका. कोणताही प्रश्न सोडू नका. आपल्या उत्तरपत्रिकेत 100 रुपयांची नोट ठेवून द्या. शिक्षक तुम्हाला डोळे बंद करून मार्क देतील, असं या प्राचार्याने विद्यार्थ्यांना सांगितले.