कोरोनाची तिसरी लाट रोखायचीये? तर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणतात…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आरोग्ययंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी भाष्य केले.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता के. विजय राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर आता राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. ते म्हणाले, ‘जर आपण कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक, राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर कोरोनाबाबतचे नियम किंवा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल. कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. असे सांगत या नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे’.

काय म्हणाले होते राघवन?

के. विजय राघवन यांनी बुधवारी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत भाष्य केले होते. ‘भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहता ते होणार आहे. मात्र, फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणे कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवे, असे ते म्हणाले होते.