YouTube पाहून घरातूनच बनावट नोटांची छपाई, चेंबूरमधून एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नोकरी गेल्याने आणि कर्जबाजारी झाल्याने एका 35 वर्षीय तरुणाने यूट्यूब पाहून चक्क घरातूनच बनावट नोटांची छपाई सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष- 4 ने कारवाई करून मंगळवारी (दि. 16) संबधित तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून लाखोंच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त केले आहे.

मोहम्मद फकियान अयुब खान (वय 35) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चेंबूर परिसरात एक जण बनावट नोटा वाटण्याकरता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत 55 हजार 450 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्याने चेंबूर येथील एमएमआरडीए वसाहतीमध्ये भाड्याने खोली घेतली हाेती. तेथेच युट्यूबवर पाहून त्याने बनावट नोटांची छपाई सुरू केली होती. खान याच्या घरातूनही लाखोंच्या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच कलर प्रिंटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक, वेगवेगळ्या रंगाचे पेन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.