जास्त नोटा छापल्याने आर्थिक मंदीचे संकट दूर होईल का ? RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोनामुळे देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्याच्या उद्देशाने जास्त प्रमाणात नोटांची छपाई करावी असे मत काही अर्थतज्ज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांनी नोंदवलेले आहे. मात्र नोटा छापण्याला एक मर्यादा असल्याने हा निर्णय फारसा प्रभावशाली आणि फायद्याचा ठरणार नाही असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. जास्त प्रमाणात नोटा छापून त्या वापरात आणण्याला एक मर्यादा आहे.

शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पावधीसाठी हा उपाय काम करेल असे मत राजन यांनी व्यक्त केले आहे. नोटा छापणे कधीपर्यंत करत राहणार ? विकासदर वाढल्यानंतर बँका केंद्रीय बँकेकडे पैसे न ठेवता ते दुसर्‍या पर्यायी ठिकाणी वापरतील तेव्हा नोट छपाई थांबेल का? असं राजन म्हणाले. सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतले जात नाही.

या कालावधीमध्ये केंद्रीय बँक अतिरिक्त चलन बाजारात आणू शकते. असे केल्याने केंद्रीय बँक आणि सरकारमधील ताळमेळ सुधारतो. मात्र याला एक ठराविक मर्यादा असते. लॉकडाऊननंतर भारतासारखी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पुर्णपणे कार्यरत झाल्यानंतर याचा कॉर्परेट क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम दिसू लागेल. आणि घेण्यात आलेले कर्जाची परतफेड होणार नाही. हळूहळू या सर्व परिस्थितीचा परिणाम बँकांच्या व्यवहारांवर होतो. त्यामुळे बँकांकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे की नाही याबद्दल सरकारला आढावा घ्यावा लागेल. हा आर्थिक क्षेत्राचा विषय आहे असे म्हणून कडे दूर्लक्ष करता येणार नाही, असा सल्लाही राजन यांनी दिला.