रेल्वे, उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला प्राधान्य

आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद मार्गे बर्‍हाणपूर हा रेल्वेमार्ग जिल्हा आणि परिसरातील विकासासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. त्यानिमित्ताने उस्मानाबाद येथे मोठे जंक्शन रेल्वेस्थानक होईल. त्यातून उलाढाल वाढेल. रोजगाराची निर्मिती होईल. पर्यायाने आपल्या परिसरात नवे उद्योग मोठ्या संख्येने येतील. त्यामुळे केंद्राच्या मदतीने रेल्वे, उद्योग, पर्यटन व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योगांच्या निर्मितीसाठी आपण प्राधान्य देणार असल्याची माहिती आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

सध्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक विषय समोर येत आहेत. पैकी बहुतांश विषय नकारात्मक आहेत. एकमेकांवर टीका करणारे आहेत. आपण त्या पलीकडे जावून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द आहोत. आपल्या १५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत जिल्ह्याचा अभ्यास, सुक्ष्म नियोजन आणि ठरविलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा, अशी आपली कार्यपध्दती राहिली आहे. त्यातूनच जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कौडगाव येथे अडीच हजार एकर क्षेत्रावर एमआयडीसीच्या प्रस्तावास आपण राज्यमंत्री असताना मंजुरी मिळवून घेतली. दीड हजार एकर जमिनीचे भूसंपादनही केले. सध्या तेथून रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली आहे. मुबलक वीज आणि पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे एक परिपूर्ण औद्योगिक वसाहत निर्माण होणार आहे. ३०० कोटी रूपयांच्या महाजनकोच्या ५० मेगावॅट प्रकल्पाला आपण राज्यमंत्री असताना मंजुरी मिळाली. दुर्दैवाने मागील पाच वर्षांत त्याची निविदा अंतिम करण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

उस्मानाबाद जिल्ह्यात नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक स्थळांची संख्या लक्षवेधी आहे. त्याला मनोरंजनात्मक बाबींची सोबत देवून एकत्रित गुंफणे गरजेचे आहे. केंद्राच्या मदतीने जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाची एक साखळी निर्माण करण्यासाठी आपण गांभीर्याने प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्यवसायाच्या नव्या संधी मोठ्या संख्येने निर्माण होतील. त्यातून रोजगार निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्याख्यानात केला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कालावधीतच जिल्ह्यात अनेक महत्वाचे प्रकल्प आणि योजना कार्यान्वीत झाले आहेत. मागील पाच वर्षात एकही दखलपात्र काम या सरकारला करता आले नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारशिवाय पर्याय नाही, असा विश्वासही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.