केसमधील साक्षीदारास धमकावण्याच्या प्रकरणात कारागृहातील पोलिसाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतून गँगवार हद्दपार झाले असून गँस्टर हा प्रकार नावालाही राहिलेला नाही, असा दावा मुंबई पोलिसांकडून केला जातो. मात्र, ऑर्थर रोड जेलमधील गँगस्टर पोलिसांमर्फतच गँग चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर खटल्यातील साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार तुरुंगातून सुरु असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ऑर्थर रोड कारागृहात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.25) केली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाने 2015 मधील एका मोठ्या केसमधील महत्वाच्या साक्षीदारास धमकावल्या प्रकरणी पथकाच्या चारकोप युनिटने गुन्हा दाखल करून साक्षीदारास धमकावणारा आरोपी सुजीत पडवळकर, गँगस्टर हरीष मांडवीकर, त्याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटु व 2015 च्या केसमधील मुख्य आरोपी साजिद युसुफ इलेक्ट्रीकवाला याला अटक केली आहे. आरोपी मांडवीकर आणि इलेक्ट्रीकवाला यांना 28 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत असून इतर दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे.

जून 2015 मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं एका टोळीचा पर्दाफास करुन एका अंमली पदार्थ निर्मिती युनिटमधून सुमारे 155 किलो कच्चा व तयार मेफेड्रॉन (MD) हा अंमली पदार्थ जप्त केला होता. या कारवाईमध्ये मुख्य आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला याच्यासह एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला हा 2015 पासूनच मुंबई मध्यवर्ती कारागृह ऑर्थर रोड येथे कैद आहे. त्याने अनेकवेळा प्रयत्न करुनही त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. या गुन्ह्यासंदर्भात खटल्याची सुनावणी ही मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयात सुरु आहे. या सुनावणीमध्ये एका मुख्य साक्षिदाराची साक्ष सुरु असताना मार्च 2020 मध्ये गँगस्टर हरीष मांडवीकर हा एका MCOCA केसमध्ये ऑर्थर रोड कारागृहात दाखल झाला. आरोपी साजिद इलेक्ट्रीकवाला याने मांडवीकर सोबत मैत्री करून 2015 च्या केसमधील साक्षीदारास धमकावण्याचा कट रचला. त्यानुसार हरीष मांडवीकर याने एक हस्तलिखित चिठ्ठीद्वारे त्याचा हस्तक सचिन कोळेकर उर्फ पिंटु याला साक्षीदारास धमकावण्यास सांगितले. त्यानुसार सचिन कोळेकरने आरोपी सुजीत पडवळकर याच्या मार्फत साक्षीदारास वारंवार धमकावले.

गँगस्टर हरीष मांडवीकर हा कारागृहातून त्यानं लिहिलेल्या चिठ्ठ्या कारागृहाबाहेर नेमक्या कशा पाठवत होता याचा ATS ने तपास केला. त्यावेळी हरीष मांडवीकर याच्या हस्तलिखीत चिठ्ठ्या कारगृहाबाहेर नेऊन त्या मांडवीकरच्या माणसाकडे देण्याचे काम ऑर्थर रोड कारागृहातील कर्तव्यावर असलेला एक कारागृह पोलिस करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सर्व पुरावे गोळा करून एटीएसने शुक्रवारी (दि.25) अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 28 डिसेंबर पर्यंत दहशतवाद विरोधी पथकाची पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान, अटक करण्यात आलेला पोलिस मागील काही महिन्यांपासून नियमितपणे गँगस्टर हरीष मांडवीकर याच्या चिठ्ठ्या कारागृहाबारे पाठवण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एटीएस करत आहे.