26 जानेवारी रोजी येरवडा कारागृहापासून ‘जेल पर्यटन’ सुरु होणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

मुंबई : राज्यातील कारागृहे स्वातंत्र्य पूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासकि घटनांचे साक्षीदार आहे. या घटनांचे सदर्भ कारागृहा प्रशासनाकडून जतन करुन ठेवण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये प्रिझन टुरिझम ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात येत्या २६ जानेवारी रोजी येरवडा जेलपासून सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पत्रकार परिषदेत केली. येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करतील. यावेळी येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत, असे देशमुख (Anil Deshmukh)  यांनी सांगितले.

येरवड, ठाणे, नाशिक कारागृहात स्वांतत्र्य लढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढार्‍यांनी या कारागृहामध्ये शिक्षा भोगली आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी कारागृह पर्यटन उपयुक्त ठरणार आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला. त्याला गांधी यार्ड असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भही जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळकांची कोठडी येथे आहे़ बॅरिस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस येरवडा कारागृहात होते. सरसंघचालक बाळासाहेब देसरस यार्डही येथे आहे. बाळासाहेब ठाकरे हे या तुरुंगात होते. यांचे सर्व संदर्भ पर्यटकांना येरवडा भेटीत पहायला मिळू शकणार आहेत.