कारागृहात त्रास दिल्याचा बदला म्हणून त्याने अधिकाऱ्यांची घरे फोडली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कारागृहात शिक्षा भोगत असताना तेथील अधिकारी व कर्मचारी यांनी त्रास दिल्याचा बदला घेण्यासाठी कारागृहातून बाहेर पडलेल्या एकाने चक्क सोलापूरहून कोल्हापूर येथे येऊन त्यांची घरेच फोडल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजेंद्र गणपती केदार (वय ३८, रा. डोनाज, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र केदार याच्यावर मंगळवेढा, चडचण, सांगली येथे चोरी, तरुणींचे अपहरण करून अत्याचार असे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान २००५ साली त्याला एका गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्यावेळी त्याच्याकडून झाडांना पाणी घालणे, वस्तूंची ने आण करणे, शेतात कामे असी कामे करुन घेतली जात होती. दरम्यान या कारागृहातील उपनिरीक्षक महादेव दशरथ होरे, कॉन्सटेबल रुपाली लालचंद नलवडे, संगीता चव्हाण, वैशाली सदाशिव पाटील हे त्रास देत होते. याचा राग त्याच्या मनात होता. डिसेंबर २०१८ मध्ये तो कारागृहातून बाहेर पडला. त्यानंतर तो गावी गेला परंतु त्याला या सर्व प्रकाराचा बदला घ्यायचा होता. म्हणून त्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांची घरे हेरली. आणि त्यांची घरे फोडली.

कारागृह निवासस्थानात तब्बल चार चोऱ्या झाल्याने पोलिसांनीही याचे गांभीर्य लक्षात घेतले. तेव्हा परिसरातील सीसीटिव्ही तपासण्यात आले. केदार हा संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीला शोधून तिला फोन करून केदार याला बोलवून घेण्यास सांगत त्याच्यासाठी हनी ट्रॅप लावला. तिने केदार याला कामासाठी पैसे हवे असल्याचे सांगण्यास लावून सांगली बसस्थानकावर बोलवून घेतले. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी आला मात्र तिने फोन बंद केला. तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून पोलिसांनी एलईडी टिव्ही, दुचाकी, १५ तोळे सोन्याचे दागिने असा साडेचार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.