येरवडयातील तात्पुरत्या कारागृहातून कैद्याचे पलायन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृह परिसरात सुरु करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून एक कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. तो लघुशंकेचा बहाणा
करून पसार झाला. यापूर्वी देखील या तात्पुरत्या कारागृहातून कैदी पसार झाले आहेत.

अनिल विठ्ठल वेताळ (रा. डीग्रजवाडी फाटा,भीमा कोरेगाव,ता.शिरुर,जि.पुणे) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा कारागृहातील रक्षक विशाल जाधव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेताळविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह््यात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या

येरवड्यातील सावित्रीबाई फुले वसतीगृह कारागृहात ठेवले होते. रविवारी रात्री वेताळने लघुशंकेचा बहाणा केला आणि तो पसार झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो सापडला नाही. अधिक तपास उपनिरीक्षक वाघमारे हे करत आहेत.