10 वी-12 वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सायन्स शिकवतोय कैदी, वर्षाला 8 लाखांचे पॅकेज

शिमला : हिमाचलच्या एका जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन क्लास घेत आहे. हे अशा काळात झाले आहे जेव्हा कोरोना काळात मोठमोठ्यांच्या नोकर्‍या, रोजगार गेला आहे आणि लोक घरात बसले आहेत. ऑनलाइन क्लास घेणार्‍या एका प्रसिद्ध कंपनीने कैद्याला त्याची पात्रता पाहून आठ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर सायन्स टीचर म्हणून हायर केले आहे. कैद्याची ही सकारात्मक भूमिका पाहून जेल विभागाने सुद्धा त्यास सर्व सहकार्य केले आहे. हिमाचलमध्ये असे पहिले प्रकरण आहे, जेव्हा एखाद्या कैद्याला एका शैक्षणिक संस्थेने इतक्या मोठ्या पॅकेजवर आपल्यासाठी सेवा देण्यास निवडले आहे.

राजधानी शिमलाच्या जेलमध्ये बंद कैद्याने राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान संस्थेत शिक्षण घेतले आहे. 2010 मध्ये प्रेयसीसोबत आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात प्रेयसीचा मृत्यू झाला तर हा बचावला आणि त्याचे जीवनच बदलून गेले. त्याला हत्येच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आणि जेलमध्ये तो दिवस काढू लागला. या दरम्यान डीजी जेल सोमेश गोयल यांनी प्रत्येक हाताला काम देण्याचे अभियान सुरू करून कुशल कैद्यांना काम देण्यास सुरूवात केली. तंत्र शिक्षण घेतलेल्या या कैद्याकडून जेल विभागाच्या तंत्रज्ञान कार्याची सेवा घेतली जात होती. यानंतर जेल विभागाच्या भरती परीक्षेसाठी सुद्धा सॉफ्टवेयर बनवण्यात त्याने मदत केली.

उच्च शिक्षित असल्याने मागच्या वर्षी त्याने एका स्थानिक कोचिंग सेंटरमध्ये तरूणांना शिकवण्यास सुरूवात केली. त्याची शिकवण्याची पद्धत इतकी चांगली होती की, मुलांनीही त्याच्याकडूनच शिकण्यात रस दाखवला. नाव चर्चेत आल्यानंतर देशातील एका मोठ्या कंपनीने ऑनलाइन सायन्स शिकवण्यासाठी त्यास ठेवले. डीजी जेल यांनी सांगितले की, काही कारणांमुळे जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना मदत करणे जरूरी आहे. असे प्रयत्न करण्यात आले आहेत, ज्यातून उद्योग आणि कंपन्यांकडून सहकार्य मिळाल्यास कैद्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो.