अर्णब गोस्वामींना मोबाईल पुरवल्याप्रकरणी 2 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन –  पैशांच्या मोबदल्यामध्ये कैद्यांना मोबाईल दिल्याप्रकरणी अलिबाग कारागृहातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांनी कारागृहात मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले होते. त्यानंतर खातेनिहाय चौकशी केली असता, त्यात दोन पोलीस कर्मचारी कैद्यांना मोबाईल वापरासाठी देत असल्याचे समजले. त्यामुळे दोघांवरही कारवाई करण्यात आली. मात्र, अर्णब यांच्याकडे मोबाईल कसा आला, त्याची चौकशी अद्यापही सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी सजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारागृहात असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मोबाईल फोन पुरवल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, कैद्यांना मोबाईल फोन पुरविल्याच्या प्रकरणी अलिबागच्या दोन कारागृह पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली गेली. अलिबाग कारागृहात गोस्वामी यांनी विलगीकरण कक्षात असताना मोबाईल फोन वापरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत खात्यांतर्गत चौकशी सुरू केली. तद्वत, अन्य कैद्यांचीही चौकशी केली असता, कारागृहातील दोन पोलीस कर्मचारी पैशांच्या बदल्यात कैद्यांना स्वतःचा मोबाईल वापरासाठी देत असल्याचे उघडकीस आले. तद्नंतर, सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वडे यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, अर्णब यांना मोबाईल सोबत, मच्छर मारणारी कॉईल पुरवण्यात आल्याने चौकशी सुरू असल्याचे कारागृह अधिकारी ए. टी. पाटील यांनी सांगितले.