Coronavirus : ‘कोरोना’मुळं कैद्यांचा पोलिसांवर ‘हल्ला’, जेलला लावली आग

कोलकत्ता : वृत्तसंस्था – कोरोनामुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रसार आता सर्वच राज्यांमध्ये आढळून आल्यानंतर सरकारने उपाययोजना वाढवल्या आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनाच मार खावा लागला. दमदम इथल्या जेलमध्ये पोलिसांनी बाहेरच्या लोकांना प्रवेश बंद केला. त्यामुळे कैद्यांना त्यांच्या नेतेवाईकांना भेटता येत नाही. तसेच कोर्ट बंद असल्याने कैद्यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी होत नाही. त्यामळे या सगळ्याचा राग कैद्यांनी पोलिसांवर काढला. कारागृहातील संतापलेल्या कैद्यांनी कारागृहातील पोलिसांवर हल्ला चढवला. तसेच कारगृहात तोडफोड करून तुरुंगात आगही लावली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. यामध्ये काही कैदी आणि पोलीस जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहातील कैद्यांनी तुरुंग प्रशासनाकडे मास्क आणि सॅनिटायजरची मागणी केली होती. दुपारी 12 च्या सुमारास कैद्यांमध्ये आणि तुरुंग अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची होऊन झटापट झाली. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार तुरुंगातून धूर आणि गोळीबार झाल्याचा आवाज ऐकायला आला. मात्र, पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान मंत्री सुजीत बोस यांनी सांगितले की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत. तुरुंगातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत भारत सरकारने आपली रणनिती बदलली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. भारतात 271 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आता सरकारने सर्व रुग्णालयातील न्यूमोनियाच्या रुग्णांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी सर्व राज्यांना आदेश देण्यात आले आहेत.