तुमचाही पक्ष वाढवा, पण आमचा गळा कापून, पुढे जाऊ नका

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाआघाडी ही सन्मानपूर्वक असावी, काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, सोबतच मित्रपक्षही वाढवा. आमचा गळा कापून किंवा आमच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ नका, अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीला सबुरीचा सल्ला दिला. इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप उपस्थित होते.
आम्ही निवडणुकीत आघाडी धर्म पाळतो. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून यावा यासाठी काम करतो. मात्र, राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीत नेहमीच दगाफटका होतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूरची विधानसेभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहिर करावे. अन्यथा आम्ही लोकसभेत आघाडीचे काम करणार नाही अशी भूमिका स्थानिक नेत्यांनी जाहीर केली.

रामदास आठवलेंच्या भाजप-सेना युतीवर नाराजीबाबतही पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. रामदास आठवले यांनी मूळ विचार सोडून भाजपची साथ दिली. मंत्रीपद भोगलं आणि आता ते नाराज असल्याचं सांगतात. मात्र त्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं याचा जनतेनं विचार करायला हवा. तसेच त्यांनी वेगळी भुमिका घेतली तरी फार काही फरक पडणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.