मोदी ‘त्या’ अपयशाची चौकशी करण्याची हिंमत दाखवतील का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुलवामा अतिरेकी हल्ला प्रकरणातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चौकशी करण्याची हिंमत दाखवतील का ? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यावर राफेलसह केंद्रातील मोदी सरकारच्या व राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. काँग्रेसचे दक्षिण-मध्य मुंबईतिल उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. याचदरम्यान, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ चेंबूर यथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा विकास आराखडा दोनदा बदलला. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राफेलसह केंद्रातील मोदी सरकारच्या व राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातील सर्व घोटाळ्यांची तसेच विकास आराखडय़ातील दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करेल. असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

इतकेचक नव्हे तर, कारगिल युद्ध समाप्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. वाजपेयी यांच्याप्रमाणे पुलवामा हल्ला प्रकरणातील गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाची चौकशी करण्याची हिंमत मोदी दाखवणार का ? असा सवालही त्यांनी केला.