पृथ्वीराज चव्हाणांच्या शिवसेनेबद्दलच्या ‘त्या’ विधानात तथ्य असू शकतं : भाजप

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की, फक्त यावेळीच नाही तर 2014 मध्ये देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याची दिसून आली. यानंतर आता भाजपनंही यावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत जबाबादार आणि मोजून मापून बोलणारी व्यक्ती आहे. आपण काय बोलतो आहोत याचं त्यांना नीट भान असतं. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं त्यांच्याबाबतीत होत नाही. ते जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात तेव्हा ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे. 2014 च्या विधानसभा निवडणुकींच्या घडामोडी मलासुद्धा बऱ्यापैकी माहिती आहेत. त्यांच्या विधानामध्ये तथ्य असू शकतं एवढंच मी सांगतो. त्यावेळी चर्चा होती परंतु या तीन पक्षांची खिचडी पकली नाही. आता ती खिचडी पकली.” एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत भंडारी बोलत होते.

पुढे बोलताना भंडारी म्हणाले, “संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, लोकसभा निवडणुकांच्या आधीपासून आम्ही चर्चा करत होतो. त्यामुळे रोज बोलणाऱ्या संजय राऊतांचं विधान आणि कमी बोलणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं विधान एकमेकांना पूरक असू आहेत. आम्ही मैत्री आणि श्रद्धेवर विश्वास ठेवतो.”दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, “राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

 

फेसबुक पेज लाईक करा –