बाळासाहेब थोरातांचे ‘हात’ बळकट करायचेत, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aaghadi) सरकार आल्यानंतर अनेकजण पक्षांतर करताना दिसून येत आहे. यामध्ये सातारा ( Satara) जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख ( Ranjitsingh Deshmukh) यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केला आहे. त्यावेळी काँग्रेस ( Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan) यांनी रणजितसिंह देशमुख यांच्यावर आमच्याकडून अन्याय झाल्याचे म्हटले. यावेळी बोलताना रणजितसिंह हे अत्यंत तडफेने काम करणारे नेते आहेत. आपण तीन पक्ष सत्तेत आहाेत, त्यातून पक्ष बळकट करायचा आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांचे हात बळकट करायचे आहेत, असं सूचक विधानदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, रणजित देशमुख यांनी सूतगिरणी यशस्वी केली, याचं काय रहस्य आहे. हे त्यांनाच विचारावा लागेल,तर पृथ्वीराज चव्हाण हे देशपातळीवरील नेते आहेत.

राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांचं मार्गर्शन लागणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी तुमची असल्याचेदेखील बाळासाहेब थोरात यांनी देशमुख यांना उद्देशून म्हटले. तुम्ही मोठे व्हा, पक्ष आपोआप मोठा होईल, असंही बाळासाहेब थोरात यांनी रणजितसिंह देशमुख यांना उद्देशून सांगितलं. माणगाव खटावचे जिल्हा परिषद माजी सदस्य आणि शिवसेनेचे तरुण नेते रणजितसिंह देशमुख स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतले आहेत. त्यांनी काही कारणास्तव 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थित त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीस दयानंद चोरघे यांनीदेखील आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठाणे जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दयानंद चोरघे यांनी पक्षांतर केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात पक्षाचं नुकसान झालं होतं. आता रणजितसिंह हे स्वगृही परतल्यानं काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोण आहेत रणजितसिंह देशमुख ?
रणजितसिंह देशमुख हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. रणजितसिंह देशमुख हे सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2007 साली जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस उभी करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. त्याचबरोबर 2003 मध्ये सोनिया गांधी यांच्या दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौऱ्याचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यामागे तत्कालीन युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे आता त्यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला पुन्हा एकदा मोठी ताकद मिळणार आहे.