भारतीय वंशाच्या प्रीति पटेल यांची ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी नियुक्‍ती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधानपदी लंडनचे माजी महापौर आणि माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची निवड झाली आहे. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी काल आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. यामध्ये त्यांनी एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश केला आहे. प्रीती पटेल या भारतीय वंशाच्या महिलेला त्यांनी गृहमंत्री पदावर नियुक्त केले आहे.

ब्रिटनमध्ये गृहमंत्री पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत. साजिद जाविद यांच्या जागी त्यांना गृहमंत्री बनविले आहे. साजिद जाविद यांना अर्थमंत्री पदावर नियुक्त केले गेले आहे. प्रीती पटेल या सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या समर्थक असून त्यांनी याआधी ब्रेक्झिटच्या प्रकरणावरून सरकारवर उघडपणे टीका देखील केली होती. गुजराती व्यक्ती ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंझर्वेटीव्ह पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या नीता पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचादेखील मोठ्या समर्थक आहेत.

ब्रिटनमधील भारतीयांमध्ये नीता पटेल लोकप्रिय असून भारतीयांच्या जवळपास सर्व कार्यक्रमांना त्या उपस्थित राहत असतात. नीता पटेल या २०१० मध्ये पहिल्यांदा संसदेत निवडून गेल्या होत्या. त्यानंतर २०१५ आणि २०१७ मध्ये देखील त्या निवडून गेल्या आहेत. याआधी देखील त्यांनी डेव्हिड कॅमरन सरकारमध्ये रोजगार खाते सांभाळले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा तगडा अनुभव आहे.

दरम्यान, या पदावर नेमणूक झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पटेल म्हणाल्या कि, मी ब्रिटनला, ब्रिटनमधील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी माझी सर्व शक्ती पणाला लावेल आणि माझ्याकडे जे अधिकार आहेत ते वापरून ब्रिटनला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.