गुजरातला जाणाऱ्या 21 प्रवाशांना खासगी बस ट्रॅव्हल्सकडून बनावट ‘कोविड’ टेस्ट रिपोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांकडून अधिकचे पैसे घेऊन त्यांना बनावट कोविड टेस्ट रिपोर्ट दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन नीता व पवन ट्रॅव्हल्समधील आरोपींचा काशीमीरा पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार समोर आल्याने बनावट दाखले देणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मुंबई परिसरातून गुजरातला बसने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्य काही ट्रॅव्हलचे मालक व चालक हे प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना बनावट कोविड चाचणी अहवाल देत असल्याची माहिती मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे कक्ष एकचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास घोडबंदर नाका येथे मिळालेल्या माहितीनुसार आलेली पवन ट्रॅव्हल्सची बस अडवली. सदर बसमध्ये 31 प्रवासी आणि बस चालक व क्लिनर असे एकूण 33 जण होते. त्यांच्याकडे कोविड चाचणीचा अहवाल मागितला असता 19 प्रवासी आणि चालक व क्लिनर यांच्याकडे असलेले आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवाल बनावट असल्याचे आढळून आले आहे. तसेच बसमध्ये कोणतेही शासकीय नियम पाळलेले नव्हते.

ट्रॅव्हल चालकांनी 19 प्रवाशांकडून प्रत्येकी 300 रुपये घेऊन त्यांनी बनावट चाचणी अहवाल बनवून दिले होते. तर अन्य 12 प्रवाश्यांकडून चाचणी बनवून देण्यासाठी प्रत्येकी 300 रुपये घेतले होते मात्र त्यांना अहवाल दिले नाही. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालक दीपकसिंग चौहान व देवीसिंग चावडा आणि क्लिनर जितेंद्रसिंग चौहान (तिघे रा. अहमदाबाद, गुजरात) यांना अटक केली आहे. तर पवन ट्रॅव्हलचा मालक हितेशभाई, नीता ट्रॅव्हलचा व्यवस्थापक संदीप व कर्मचारी जिग्नेश पटेल यांचा पोलीस शोध घेत आहे. कोविड चाचचणीचे बनावट अहवाल आणले कुठून आणि यापूर्वी किती जणांना दिले याचा शोध पोलीस करत आहेत.