Coroanavirus : खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप, सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. परंतु, याकडे दुर्लक्ष करत खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरुच आहे. यासंदर्भात आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे खासगी रुग्णालयांना त्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथकं नेमण्यात आले असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठवले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सुचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने 21 मे 2020 रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करुन दिली आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय 23 मे रोजी घेण्यात आला असून 30 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत.

तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, तसे असतानाही रुग्णालयांकडून अधिकचे शुल्क घेण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. आरोग्य मंत्र्यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्यात यावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

भरारी पथकाचे काम
– वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकामार्फत करण्यात येईल.
– खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.
– खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.
– आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.
– महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी.