खासगी रुग्णालयांनी अन्य रुग्णांवर विनाविलंब उपचारासाठी ‘कोरोना’ टेस्ट करिता अँटीजेन किट वापरावे : महापौर

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांची रॅपिड तपासणी सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या अर्ध्या तासांत अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्ट किट पालिकेकडे उपलब्ध झाल्या असून उद्यापासून याचा वापर सुरू केला जाणार आहे. शहरातील खासगी रुग्णालयानी देखील त्यांच्याकडे अन्य आजारावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी अँटीजेन किट वापरावेत, जेणेकरून अशा रुग्णांवर विनाविलंब उपचार करणे शक्य होईल, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची कोविड – 19 तपासणी करण्यात येते. यासाठी संपर्कातील नागरिकांना कोविड सेंटर मध्ये नेण्यात येते. तेथे स्वाब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांत टेस्टिंग चे प्रमाण वाढल्याने प्रयोग शाळेकडून तपासणी अहवाल मिळण्यास एक- दोन दिवस लागतात. तोपर्यंत कोविड सेंटर मध्ये सर्वच संशयित एकत्रच असतात.

साधारण देशभरात हीच परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीस्थित एका कंपनीने कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यासाठी अँटीजेन किट तयार केले आहे. या किटला आयसीएमआर ने मान्यता दिली आहे. राज्य शासनानेही रॅपिड टेस्ट साठी अँटीजेन किट वापराला मान्यता दिल्यानंतर महापालिकेने एक लाख किटची ऑर्डर दिली होती. त्यापैकी काही किट्स महापालिकेला उपलब्ध झाल्या आहेत.

या किट्स बाबत बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील संशयितांच्या तपासणी साठी अँटीजेन किटचा उद्यापासून वापर सुरू करण्यात येईल. यामुळे कोविड सेन्टर मध्ये तपासणी साठी येणाऱ्यांना फार काळ थांबावे लागणार नाही. तपासण्या लवकर झाल्यास तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यासोबत कोविड टेस्ट सुरूच ठेवण्यात येणार आहेत. त्यांचा वापर लक्षणे आढळणाऱ्या संशयितांसाठी होईल. त्यांचे प्रयोग शाळेतील रिपोर्ट ही वेळेत मिळतील.

सध्या अन्य आजार असलेल्या रुग्णांची कोविड टेस्ट केल्याशिवाय अन्य उपचार केले जात नाहीत. विशेषतः पालिकेच्या रुग्णालयात होणाऱ्या प्रसुती मध्ये सिझेरियन ऑपरेशन चा निर्णय घेताना अवघड होऊन जाते. अशा परिस्थितीत अँटीजेन तपासणी परिणामकारक ठरेल. खासगी रुग्णालयातही अशीच परिस्थिती असून खासगी रुग्णालयानी देखील अँटीजेन चाचणी सुरू केल्यास रुग्णांवर विनाविलंब उपचार करणे शक्य होईल, असे आवाहन मोहोळ यांनी खासगी रुग्णालयांना केले आहे.

या एका किटची किंमत 450 रुपये असून अर्ध्या तासात अहवाल मिळतो. याची परिणामकारकता 96 टक्क्यांपर्यंत आहे, असेही महापौर मोहोळ यांनी यावेळी नमूद केले. आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी अँटीजेन किट वापराबाबत महापौर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना माहिती दिली. याप्रसंगी नगरसेवक आनंद रिठे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.