वाकडमध्ये खासगी सुरक्षा रक्षक बेभरोशी…

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – आपल्या घराची, सोसायटी तसेच व्यवसायिक इमारतीच्या आणि मालमत्तेसाठी हजारो रुपये मोजून खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात. मात्र हे खासगी सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी मस्त झोपतात आणि चोरट्यांना निमंत्रण देतात. यामुळे वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे अचानक सर्च मोहीम राबवून खासगी सुरक्षा रक्षकांची पोळखोल केली.

‘मराठा समाज पक्ष’ हे भाजपचे पिल्लू  

बुधवारी पहाटे अडीच ते चार वाजेपर्यंत परिसरातील ३५० सोसायट्यांमधील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी जवळपास ६० टक्के सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक झोपलेले आढळून आले. यामुळे सुरक्षा रक्षक किती बेभरोशी आहेत हे आढळून आले आहे.
दिवाळीमध्ये अनेक कुटुंबीय आपल्या गावी जातात. यामुळे सोसायट्यांमधील अनेक फ्लॅट बंद असतात. सोसायटींना सुरक्षारक्षक असूनही अनेक सोसायट्यांमध्ये एकाच रात्रीत अनेक फ्लॅटमध्ये चोरी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या आठवड्या पासून शाळांना सुट्टी लागणार असून अनेकांच्या गावी जाण्याच्या तयारी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटींमधील सुरक्षारक्षक किती सतर्क आहे याचा आढावा वाकड पोलिसांनी बुधवारी पहाटे घेतला.

पहाटे दोन वाजता वाकड पोलिस ठाण्यातील ७० पोलिसांना नियोजनाप्रमाणे वाकड पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण, उपनिरीक्षक हरीष माने यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन वेगवेगळी ३५ पथके तयार केली. प्रत्येक पथकाला नियोजनानुसार दहा सोसायट्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सोसायट्यांमध्ये जाऊन तपासणी केली. यावेळी पोलिसांना जवळपास ६० टक्यांहून अधिक सुरक्षा रक्षक झोपलेल्या स्थितीत आढळून आले. तपासणीसाठी गेलेल्या पोलिसांनी झोपलेल्या सुरक्षा रक्षकाचे फोटोही काढले.

वाकड पोलिसांनी अचानकपणे केलेल्या सर्च मोहिमेमुळे खासगी सुरक्षा आणि एजन्सीचा गाफीलपणा समोर आला आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या होण्याच्या कारणामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे. वाकड पोलीस संबंधित सोसायटी तसेच सुरक्षा एजन्सीला पत्र देऊन याबाबत माहिती देणार आहेत.