तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांना याबाबतचे पत्र पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिले. यावेळी नवाब मलिक यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादीने नेहमी पुढाकार घेतला आहे.
आघाडी सरकार असताना २००४ साली संजय गांधी निराधार योजनेचा लाभ ट्रान्सजेन्डर जातीसाठी देण्यात आला होता असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी प्रिया पाटील यांचे पक्षात मनापासून स्वागत केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या ट्रान्सजेन्डर जातीसाठी काम केले आहे. त्यात प्रिया पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. ३७७ बिलच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आहे. आम्ही सर्वसमाज घटकांना सोबत घेवून चालणारे लोक आहोत असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने ही संधी मला दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रिया पाटील यांनी आभार मानलेच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रश्नांसाठी मदत केल्याची कबुली देताना पक्षाशी एकनिष्ठ राहीन अशी स्पष्ट भूमिका प्रिया पाटील यांनी मांडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,यवतमाळच्या महिला नेत्या क्रांती थोटे, प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते.