पत्रकार प्रिया रमाणी यांना अकबर यांच्या बदनामीप्रकरणी जामीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – #मी टू या सोशल मीडियावरील मोहिमेअंतर्गत पत्रकार प्रिया रमणी यांनी एम.जे अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता .त्यानंतर अकबर यांनी रमणी यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात रमणी यांना पटियाला हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

रामाणी यांना १० हजार रुपयांच्या बॉन्डवर हमीपत्र लिहून दिल्यानंतर जामीन देण्यात आला. यावेळी ” पुढील तारीख १० एप्रिलला आहे. त्या वेळेस माझ्यावरती आरोप ठेवण्यात येतील. त्यानंतर मला माझी बाजू सांगण्याची संधी मिळेल. मी सत्य सांगेन. तेच माझ्यावरील आरोपांविरोधात माझा बचाव असणार आहे” असे रमणी म्हणाल्या

कायमस्वरूपी उपस्थित न राहण्यासाठी मागणी

दरम्यान , पटियाला हाउस कोर्टात आल्या असताना रमाणी यांनी न्यायालयाकडे सुनावणीवेळी स्वतः उपस्थित न राहण्यासाठी कायमस्वरूपी सवलत मागितली आहे. ‘रमाणी या बंगळुरु येथील रहिवासी असून त्यांना लहान मूल आहे. त्यांना सुनावणीसाठी नियमितपणे उपस्थित राहणे कठीण आहे,’ असे रमाणी यांच्या वकील रेबेका जॉन यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, ‘तुमच्या अशीलाने तक्रार नोंदविली आहे. त्यांनी येथे हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, ते हजर नाहीत,’ असेही रेबेका यांनी अकबर यांचे वकील संदीप कपूर यांना सुनावले.

रमणींना पाठिंबा देण्यासाठी अनेक प्रकरणाची उपस्थिती

या वेळी, रमाणी यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रकार राजदीप सरदेसाई, निधी राजदान, सागरिका घोष, सिद्धार्थ वरदराजन आणि हरिंदर बावेजा हे उपस्थित होते. माजी संपादक अकबर यांच्यावर किमान २० महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अकबर यांनी १७ ऑक्टोबरला परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली होती. अकबर यांनी २० वर्षांपूर्वी आपले लैंगिक शोषण केले, असा आरोप रमाणी यांनी केला होता.