‘राजा हिंदुस्तानी’ फेम कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते आणि कथ्थक गुरु वीरू कृष्णन यांचे शनिवारी निधन झाले. राजा हिंदुस्तानी, अकले हम अकले तुम, इश्क या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना त्यांनी कथ्थक व नृत्यप्रकार शिकवला होता. यामध्ये प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ, लारा दत्ता यांचा समावेश आहे. वीरू यांच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.

प्रियंकाने ट्विटद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोक संदेशात प्रियांका म्हणते, जेव्हा मी नीट नाचूही शकत नव्हेत तेव्हापासून तुम्ही मला कथ्थक शिकवले. नृत्यासाठी असलेला तुमचा संयम आणि जिद्द पाहून आम्ही केवळ कथ्थकबद्दलच नाही तर तुमच्याकडूनही खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला. तुमची आठवण सदैव राहील गुरुजी, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

ही अत्यंत दु:खद बातमी आहे. गुरुजी सर्वोत्तम कथ्थक प्रशिक्षक होते. त्यांच्याकडून बरच काही शिकण्यासारख होतं, असे लारा दत्तने ट्विटमध्ये लिहले आहे. सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीनेही ट्विटद्वारे गुरुजींना श्रद्धांजली वाहिली आहे. मेहनत, शिस्त आणि कथ्थक या नृत्यप्रकारावर प्रेम करायला शिकवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असे अथियाने ट्विटमध्ये लिहले आहे.