देसी गर्ल प्रियंकाचा मादाम तुसादमध्ये पुतळा !

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचे चाहते केवळ भारतातच नाही तर विदेशातही आहेत तिची वाढती लोकप्रियता पाहून या देसी गर्लचा अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

याचसोबत प्रियंका मादाम तुसादच्या चार संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे. आत्तापर्यंत केवळ अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.

प्रियंकाने न्यूयॉर्कस्थित मादात तुसाद संग्रहालयाला भेट दिली. आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत. हॉलिवूड टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’ मधून प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर बेवॉच, अ किड लाईक जेक अशा हॉलिवूडच्या चित्रपटातही झळकली आहे. लवकरच तिचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे.