सासूबाई रूसल्या ? मुलाच्या लग्नाच्या वर्षभरानंतर नाराज झाल्या प्रियंका चोप्राच्या ‘Mother-In-Law’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ डिसेंबर २०१८ रोजी प्रियंका चोप्रा अणि निक जोनास यांनी लग्न केले. मागील वर्षाच्या १ डिसेंबरला या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. परंतु या दोघांच्या लग्नाबाबतच्या चर्चा अजून काही थांबलेल्या नाहीत. प्रियंका आणि निकचा शाही लग्न सोहळा जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडला होता. या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधले होते. फक्त भारतातच नाही तर परदेशातही या लग्नाची चर्चा झाली होती. परंतु या लग्नाबाबत सध्या वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. ती म्हणजे त्यांच्या या शाही लग्नात निकचे आई वडील म्हणजेच प्रियंकाचे सासू सासरे हे नाराज होते.

आपल्याकडे लग्नातील मानपानावरून वधू पक्षावर वर पक्ष नाराज असल्याच्या घटना काही नवीन नाहीत. लग्न म्हटले की काहीना काही गोष्टींमुळे नाराजी होत असते. परंतु प्रियंकाच्या लग्नाबद्दलही असे घडते, ही जरा न पटणारी बाब आहे. परंतु हे खरं आहे. अलीकडच्या काळातच एका मुलाखती दरम्यान प्रियंकाचे सासरे पॉल केविन जोनास आणि सासूबाई डेनिस जोनास यानी प्रियंका-निकच्या लग्नाबद्दलचा आपला अनुभव शेअर केला. हा अनुभव सांगत असताना त्यांनी आपल्या नाराजीचा खुलासा केला.

प्रियांका आणि निकच्या लग्नाचा सोहळा पाहून सगळ्यांचे डोळे दिपले होते. असे असले तरी प्रियांकाच्या सासूबाईंना त्यांच्या लग्नाचे फोटो आवडले नव्हते. हे शाही लग्न ज्यापद्धतीने फोटोग्राफर्सने आपल्या फोटोत कॅप्चर केले, त्याबद्दल त्या प्रचंड नाराज होत्या. त्यांना वाटत होते की इतके शाही लग्न असतानाही फोटोग्राफर्सना ते व्ययस्थित कॅमेऱ्यात कैद करता आले नाही. अजून चांगल्या पद्धतीनं हा भव्य लग्न सोहळा कॅमेऱ्यात कॅप्चर करता येऊ शकला असता. जो शाही थाट फोटोत दिसायला हवा होता तो दिसलाच नाही असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्या नाराज होत्या. सध्या तरी प्रियंकाने याबाबत काही स्पष्टीकरण दिलेले नाही. आता सासूबाईंची नाराजी प्रियंका कशी दूर करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.