वाराणसीत नरेंद्र मोदी vs प्रियंका गांधी ?

प्रियंका गांधींनी दिले संकेत

लखनौ : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी गुरुवारी वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यामुळे, येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट प्रियंका गांधी यांच्याशी लढत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी या काल रायबरेलीच्या दौऱ्यावर असतांना तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी मी वाराणसी येथून निवडणूक लढवू का? असा प्रतिप्रश्न प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केला. त्यावेळी प्रियंका गांधींच्या या प्रश्नाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. इतकेच नव्हे तर, तुम्ही वाराणसी येथून लढा, त्यामुळे पूर्वांचलमध्ये पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वातावरणनिर्मिती होईल. असेही कार्यकर्त्यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील कुठल्याही मतदार संघाचे नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचे नाव घेतले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्यासाठी काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.