सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रियंका गांधी पहिल्यांदाच अडचणीत, बाल संरक्षण आयोगाने पाठवली नोटीस

दिल्ली : वृत्तसंस्था  –   काँग्रेससच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे अडचणीत आल्या आहेत. कानपूर शेल्टर होममध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर प्रियंका गांधी यांनी फेसबुकवर एक टिप्पणी केली होती, यानंतर उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेश बाल संरक्षण हक्क आयोगाने प्रियंका गांधी यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये कानपूर निवारा गृह प्रकरणाबद्दल त्यांनी टाकलेल्या फेसबुक पोस्टवर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. वेळेत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच कानपूरमधील उत्तर प्रदेश महिला आधार गृहात 7 तरुणी गर्भवती असल्याचे आढळले होते. तसेच 57 तरूणींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. सोशल मीडियावरही लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

शेल्टर होममधील तरुणी गर्भवती असून कोरोना व्हायरसची लागण मोठ्याप्रमाणात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठविली. मानवाधिकार आयोगाने याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना जाब विचारला होता. याशिवाय राज्य महिला आयोगाने कानपूरच्या डीएमकडे अहवाल मागितला आहे.

क्षमतेपेक्षा जास्त महिला राहात होत्या

गर्भवती मुलीला एचआयव्ही संसर्गाची माहिती नव्हती, जर असती तर त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला असता. महिला निर्वासित आणि बाल सुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त महिला राहत आहेत, अशी स्पष्ट कबुली या प्रकरणी जिल्हा प्रोबेशन अधिकारी अजित यांनी दिली आहे. दरम्यान, यासंबंधी कानपूर जिल्हा दंडाधिकारी डॉ. बीडीआर तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.