13 व्या वर्षी रॉबर्ट वाड्रा यांच्याशी भेटल्या होत्या प्रियंका गांधी, 6 वर्षाच्या भेटीगाठीनंतर केलं लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या लग्नाचा आज २३ वा वाढदिवस आहे. त्या दोघांनीही आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक जुने आणि खास फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांचे लग्न १८ फेब्रुवारी १९९७ रोजी झाले होते.

प्रियंकाने देखील आपले वडील राजीव गांधी यांच्यासारखा प्रेम विवाह केला होता. प्रियंका ह्या दिल्लीतील एका बिजनेसमॅन रॉबर्ट वाड्रा यांच्या प्रेमात पडल्या. त्या जेव्हा पहिल्यांदा रॉबर्ट वाड्रा यांना भेटल्या तेव्हा त्यांचे वय केवळ १३ वर्ष होते. यानंतर हळू हळू दोघांमध्ये संभाषण होऊ लागले आणि बघता बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

व्यावसायिक कुटुंबातून आलेल्या रॉबर्ट वाड्रा यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म १८ एप्रिल १९६९ मध्ये उत्तरप्रदेश च्या मुरादाबाद शहरात झाला होता. मुरादाबाद शहर हे पितळ कामासाठी प्रसिद्ध आहे.

रॉबर्ट वाड्रा यांचे वडील राजेंद्र वाड्रा हे पितळेचे उद्योगपती होते तर त्यांच्या आई ह्या मूळच्या स्कॉटलंड येथील आहेत. रॉबर्ट वाड्रा यांचा संबंध पाकिस्तानच्या सियालकोटशी देखील आहे. फाळणीच्या वेळी रॉबर्ट वाड्रा यांचे आजोबा सियालकोटहून भारतात आले होते.

रॉबर्ट वाड्रा आणि प्रियंका गांधी हे एकाच शाळेत शिकत होते. या दोघांची भेट रॉबर्ट वाड्रा यांची बहीण मिशेल वाड्रा यांच्यामार्फत झाली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.

रॉबर्ट वाड्रा यांचे कुटुंब पितळ व आर्टिफिशियल ज्वेलरीच्या व्यवसायात होते. रॉबर्ट अनेकदा प्रियंकाला खास ज्वेलरी गिफ्ट म्हणून देत असत. रॉबर्ट लवकरच प्रियंकाचे भाऊ राहुल गांधी यांचे देखील मित्र बनले.

एकदा प्रियंका रॉबर्टला भेटण्यासाठी मुरादाबादला आल्या तेव्हा त्यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. तथापि, रॉबर्ट वढेरा यांना त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती होऊ द्यायचे नव्हते.

रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही दिल्लीतील एका ब्रिटीश शाळेत शिक्षण घेत असताना भेटलो. मला वाटलं की तिला माझ्यात रस आहे. आम्ही दोघे एकमेकांशी खूप चर्चा करायचो पण मला असे वाटत नव्हते की लोकांना त्याबद्दल माहिती व्हावी कारण लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतले असते.

प्रियंकाच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त असायचा परंतु वर्गमित्र असल्याने रॉबर्ट आणि प्रियंकाला एकमेकांना भेटण्याची संधी भेटत होती. रॉबर्ट वाड्रा यांनी प्रियंकाकडे थेट लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. प्रियंका आणि तिचे कुटुंबीय रॉबर्टला लहानपणापासूनच ओळखत होते, म्हणून प्रियांकाने त्वरित होकार दिला.

जेव्हा दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते आपल्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचले. अहवालानुसार रॉबर्टचे वडील या लग्नासाठी आधी तयार नव्हते पण नंतर लग्नाला त्यांनी परवानगी दिली. १८ फेब्रुवारी १९९७ रोजी दोघांचे लग्न झाले. दोघांनी त्यांचे लग्न सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दस जनपथ येथे हिंदू रितीरिवाजानुसार केले होते. प्रियंका आणि रॉबर्टला दोन मुलं देखील आहेत. मिराया वाड्रा आणि रेहान वाड्रा अशी या दोन मुलांची नावं आहेत. सध्या ते संपूर्ण कुटुंबासहित गुडगाव येथे निवास करतात.

रॉबर्ट एखाद्या श्रीमंत कुटुंबातील नव्हते किंवा असामान्य प्रतिभा असणारे देखील नव्हते. तसेच ते बऱ्याच परीक्षांमध्ये नापास देखील व्हायचे, परंतु रॉबर्टचा साधेपणा प्रियंकाला आवडला आणि दोघांनीही आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला.

प्रियंकाने तिचे पती रॉबर्ट वाड्रा बद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते माझ्याशी वेगळ्या पद्धतीने वागले नाही, मला ते आवडले. ते मनाने फार प्रामाणिक आहेत. ते आपल्या पद्धतीने जीवन जगतात आणि इतर गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. त्यांच्यासाठी एक हाय प्रोफाइल राजकीय कौटुंबिक वातावरण नवीन होते परंतु त्यांनी सर्व काही सहजरित्या हाताळले ते खूप आश्चर्यकारक आहे.” विशेष म्हणजे प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा कितीही कठीण परिस्थितीत असले तरीही एकमेकांच्या पाठीशी नेहमीच ते उभे राहिले आहेत.