नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशाबाहेर पळून गेलेल्या निरव मोदीला लंडनमध्ये काल बुधवारी अटक झाली. यावरुन मोदी सरकार श्रेय घेत घेत असताना काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी  यांनी नीरव मोदीच्या अटकेबाबत निरवला लंडनला कुणी जाऊ दिलं ? असा प्रश्न विचारला आहे.

काँग्रेसच्‍या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त उत्तर प्रदेश दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी नीरव मोदीच्या अटकेवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, यात यश कसलं ? त्याला भारताबाहेर कोणी जाऊ दिलं होतं?,’  नीरव मोदीची अटक म्हणजे मोदी सरकारचे मोठे यश असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यावर नीरव मोदीच्या अटकेचं श्रेय मोदी सरकारचं नाही, असंदेखील त्या म्हणाल्या.

निवडणुकीनंतर भाजपा नीरव मोदीला परत पाठवेल –

भाजपानेच नीरव मोदीला पळून जाण्यास मदत केली होती. तेच त्याला आता भारतात आणत आहेत. निवडणुकीसाठी नीरव मोदीला ते भारतात घेऊन येत आहेत. निवडणुकीनंतर ते (भाजपा) त्याला पुन्हा पाठवतील, असा आरोप काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी केला होता.

बँक खाते उघडतानाच नीरव मोदीला अटक –

नीरव मोदी लंडनमधील मेट्रो बँकेत आपले खाते उघडण्यासाठी गेला असताना बँकेच्या एका अधिकाऱ्याने सतर्कता दाखवत निरव मोदीला पकडण्यास मदत केली. बँक क्लार्कने निरव मोदीला ओळखले आणि स्कॉटलंड यार्डला माहिती दिली. काही वेळातच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि निरव मोदीला अटक केली. नीरवला लंडनमधील न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीरवनं न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आला.  या घटनेनंतर भारतीय तपास यंत्रणाही आता निरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी कामाला लागल्या आहेत.