प्रियांका गांधींच्या निवडीने काँग्रेस भवनात जल्लोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस भवनात पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. काँग्रेस भवनात संध्याकाळी पाच वाजता पक्षाचे नेते, कार्यकर्ते जमा झाले. पटांगणात प्रियांका गांधी, राहुल गांधी यांचे मोठे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यासमोर नेते, कार्यकर्ते जमले वाद्यांच्या गजरात झेंडे नाचवून आनंद व्यक्त करण्यात आला. टोपलीभर पेढे वाटण्यात आले. या जल्लोषात पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर कमल व्यवहारे, दीप्ती चवधरी, महिला आघाडी प्रमुख सोनाली मारणे, प्रवक्ते रमेश अय्यर, नगरसेवक अजित दरेकर आदी सहभागी झाले होते.

प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यांनी राजकारणात यावे अशीच आमची इच्छा होती अशी प्रतिक्रिया बागवे यांनी व्यक्त केली. प्रियांकाजींनी योग्य वेळी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व नेते, कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे असे दीप्ती चवधरी म्हणाल्या. आता देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळेल असे मत अय्यर यांनी व्यक्त केले.