प्रियांका गांधीची पहिली सभा नंदूरबारमध्ये ?

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाईन – गांधी कुटूंब आणि नंदूरबारमधील आदिवासींचे एक वेगळे नाते आहे. प्रियांका गांधीच्या राजकारणातील प्रवेशाचा शुभांरभ काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे नंदूरबारमधून व्हावा अशी काँग्रेसच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी प्रियांका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवण्यात आले आहे.
लोकसभा असो की, विधानसभा गांधी कुटूंबाकडून प्रचाराचा नारळ नंदूरबार मधूनच फोडला जातो. इंदीरा गांधीपासूनची ही परंपरा आजही कायम राखून प्रियांका गांधीचे राजकारणातील पदार्पण आता नंदूरबार मधूच करण्याची तयारी सुरू आहे. सोनिया गांधीच्या राजकारणातील प्रवेशाची पहिली सभाही नंदूरबारमध्येच झाली होती. गांधी घराण्याने नंदूरबारमधून सभा घेवूनच यश मिळ‌वले आहे. काँग्रेसचे लोकसभेसाठीचे इच्छुक उमेदवार आमदार के.सी.पाडवी आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी  प्रियांका गांधीसह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पत्र पाठवले आहे. त्यामुळे याबाबत काँग्रेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. काँग्रेसने प्रियांका गांधी यांच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाचं सरचिटणीसपद देण्यात आलं आहे. त्यांचा या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश झाला असून हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. इंदीरा गांधीचे सगळे गुण प्रियंकात असल्याने राहूल गांधी ऐवजी प्रियंका गांधीनी काँग्रेसची धूरा सांभाळावी अशी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची मागणी होती.