डाॅक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या ‘त्या’ शहीद जवानाच्या मुलीला प्रियंका गांधींचं मदतीचं वचन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डाॅक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शहीद जवानाच्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. एका शहीद मुल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात उन्नाव येथील जवान अजित कुमार आझाद शहीद झाले आहेत. शहीद जवान आझाद यांची मुलगी ईशा हिला डाॅक्टर व्हायचं आहे. आपली ईच्छा सांगण्यासाठी ईशाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला आणि आपले डाॅक्टर होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.

यावेळी प्रियंका गांधी यांनी ईशाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.

उन्नावमधील काँग्रेसच्या माजी खासदार अन्नू टंडन यांच्या मदतीने ईशाचा संपर्क प्रियंका गांधींसोबत झाला. यावेळी ईशासोबत बोलताना प्रियंका गांधी यांनी फोनवरून तिला भविष्यात काय करायचे आहे ? असा प्रश्न विचारला. त्यावर ईशा म्हणाली, “डॉक्टर बनून जनतेची मदत करण्याची माझी इच्छा आहे.” हे ऐकून प्रियंका गांधी यांनी तिचे स्वप्न पूर्ण करण्यास पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.

१४ फेब्रुवारीच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद
गुरुवारी (१४ फेब्रुवारीला) पुलवामा येथे जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण ७८ वाहने होती आणि त्यातून एकूण २,५४७ जवान प्रवास करत होते.

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने हा हल्ला घडवून आणला. लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार आदिलने बसला धडकवली. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला.

सुरक्षा जवानांच्या ताफ्याला असे कारद्वारे लक्ष्य करण्याचा हा पहिलाच आत्मघाती हल्ला आहे. या स्टाइलने आतापर्यंत सीरिया आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना हल्ला करत होत्या. हल्ल्याची ही पद्धत भारतात प्रथमच वापरली गेली आणि ती वापरण्यासाठी एका स्थानिक काश्मिरी तरुणाचा वापर केला गेला, हीच आता अतिशय चिंतेची बाब बनली आहे. या हल्ल्यानंतर आता सुरक्षा दलांची चिंता वाढली असल्याचं दिसत आहे.