काय सांगता ! होय, महाराष्ट्रात ‘या’ जिल्हयात शेळीच्या दुधापासुन होतेय साबणाची निर्मिती

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. याच उस्मानाबादच्या 25 गावातील शेतकऱ्यांनी शेळीच्या दुधापासून साबण बनवून दुष्काळावर तसेच परिस्थीतीवर मात केली आहे. या कामात त्यांना ‘शिवार’ ही स्वयंसेवी संस्था मदत करते.

‘शिवार’ या स्वयंसेवी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हेगाना यांनी दिलेल्या माहितीनुसार , ज्या शेतकऱ्यांनी गरिबीमुळे आत्महत्या केली आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा शेतकर्‍यांच्या कुटुंबांसाठी हे काम सुरू करण्यात आले आहे.पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याऐवजी आम्ही त्यांना उपजीविका कशी करावी हे शिकवण्याचे ठरविले. उस्मानाबादी शेळ्यांचा संगोपनाद्वारे नफा कसा कमवू शकतात याविषयी त्यांना माहिती दिली.

व्यवसायासाठी उस्मानाबादी शेळ्यांची निवड करण्याचे कारण –
व्हिटॅमिन ए, ई, सेलेनियम आणि अल्फा हायड्रोक्सी आम्लाने समृद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळीचे दुध त्वचा रोगांवर उपचार करण्यासाठी उपयोगी आहे. उस्मानाबादी शेळी दुध आणि मांस दोन्हीसाठी वापरली जाते. साधारणपणे वर्षातून दोनदा बकऱ्यांची पैदास होते. या जातीचे मृत्यूही कमी आहे. सर्वसाधारणपणे पाळलेल्या जमुनापरी जातीच्या शेळ्या फक्त दुधाच्या बाबतीतच चांगल्या असतात, परंतु त्यांचा मृत्यूदर अधिक आहे.

Visit :  Policenama.com