ऑनलाईन शिक्षण प्रयोग आणि वास्तव : प्रा. रेश्मा देशपांडे

पुणे – कोरोनाच सावट संपूर्ण देशावर पडले… आणि जग थांबले… सर्व क्षेत्रांवर याचा परिणाम झाला… साहजिकच शिक्षणचे क्षेत्र याला अपवाद कसे असणार… शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ उडाली… लॉकडाऊन मार्चमध्ये जाहीर झाले. त्यानंतर चा कालखंड हा सर्व शैक्षणिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा…. या कालावधीत शाळेच्या परीक्षा तसेच विविध शाखांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कालखंड… कारण या कालावधीत विविध सबमिशन…. प्रॅक्टिकल आणि परीक्षा असतात… लॉकडाऊन चा कालावधी वाढत गेला आणि विद्यार्थी वर्गात एकच गोंधळाच वातावरण पसरले, असे मत प्रा.रेश्मा देशपांडे यांनी व्यक्त केले.

देशपांडे म्हणाल्या की, आता आमचं नक्की काय होणार? परीक्षा कधी होणार? यासारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले. लॉकडाऊन वाढल्याले शालेय पातळीवरच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेत पाठवण्यात आले. आता प्रश्न होता महाविद्यालयीन परीक्षांचा. त्याबाबतीत पण सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय करण्यात आला. फक्त पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घेतल्या जातील असे ठरले. आता परीक्षा कशा घायच्या हे ही मोठे आव्हानं होते कारण सोशल डिस्टंसिंग पाळून परीक्षा घेणे अवघड होते.

परीक्षा रद्द करायच्या की घ्यायच्या अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे. या कालखंडात ऑनलाईन लेक्चर्स घेण्यात आली..सर्व कारभार ऑनलाईन चालू झाले. अनेक मीटिंग अनेक उपक्रम ऑनलाईन होवू लागले. सेमिनार ऑनलाईन होवू लागले. दोन महिने हे असेच चालू आहे. आता खरा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे नवीन येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचा. मग तो शालेय पातळीवर असू देत किंवा महाविद्यालयीन पातळीवर. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था सुरू होणार नाहीत हे शासनाने जाहीर केले. मग आता याला पर्याय काय. म्हणूनच ऑनलाईन शाळा भरविण्यात यावी असे सांगण्यात आले.

लहान मुलांचे ऑनलाईन क्लास सुरू झाले. माझ्या बहिणीशी बोलले तेव्हा कळलं की माझ्या भाचीचा ऑनलाईन क्लास सुरू झाला. लहान लहान मुले ऑनलाईन क्लास ला बसू लागली. एवढी लहान मुले एकाजागी कशी बसणार. मला अशीही माहिती मिळाली मुले कंटाळत आहेत. प्रत्यक्ष शाळेत जावून शिकणे आणि ऑनलाईन शिकणे यात निश्चितच फरक आहे. आज ऑनलाईन शाळा भरवायचे हे धोरण पुढे येत आहे. आधुनिक काळ हा तंत्रज्ञानाने समृध्द आहे. परंतु अशी ऑनलाईन शाळा भरवली तर त्याला कितपत यश येईल. कारण आज ऑनलाईन शाळा भरावयाचे म्हटले तर त्याला आवश्यक सामुग्री प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणे गरजेचे आहे.

Android phone सगळ्यांकडे असणे गरजेचे किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉप असणं गरजेचं ठरते. आज आपण शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार केला तरी सगळ्यांकडे या गोष्टी असतील का? कारण आपल्या देशात आजूनही मोठी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. झोपडपट्टीत राहणारा वर्ग त्यात शिकणाऱ्या मुलांच काय, आणि अशा विद्यार्थ्यांना काही सोयी दिल्या तरी त्याचा योग्य उपयोग केला जाईल का? याची काय खात्री…बर अगदी सधन घरातील मुले तरी खऱ्या अर्थाने ऑनलाईन लेक्चर्स किती प्रामाणिक पणाने ऐकतील. हातात मोबाईल फोन घेवून ते इकडे तिकडे फिरू शकतात. मग यातून खरेच शिक्षण होईल का? तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची आकलनक्षमता भिन्न असते, असे ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांना झेपेल हाही प्रश्न आहेच. अनेक वेळा नेट वर्क प्रॉब्लेम येवू शकतो.

महाविद्यालयीनच काय सर्वच विद्यार्थी वर्गाबाबत असे अनेक प्रश्न निर्माण होवू शकतात. मग शालेय पातळीवरील लहान मुलांचा तर किती तरी मोठा प्रश्न होवू शकतो…लहान मुलांची ऑनलाईन शाळा म्हटल्यावर पालक पण पूर्ण अडकून पडत आहेत त्यांना पाल्यां जवळ थांबायला लागत आहे..मुल कंटाळली की पालकांचा होम वर्क लिहून घ्यायची वेळ येत आहे. जे पालक वर्क फॉर्म होम करत आहेत त्यांना हे मुलांचे शिक्षण अवघड कारण पालक पण त्यात अडकणार. त्यात आता काही शाळा ऑनलाईन सुरू झाल्या आहेत. ज्या मैत्रिणीची मुले शाळेत आहेत आणि त्यांच्या मुलांच्या दहावीच्या ऑनलाईन शाळा सुरू झाल्या त्यांच्याशी बोलले तर लक्षात आलं की लक्ष देवून अभ्यास होत नाही.

शाळेचा गणवेश घालून ती मुले ऑनलाईन बसतात आजुबाजूला पालक नाहीत. ज्या मुलांना जास्त अभ्यासाची गोडी नाही..ती मुले आत काय करतात रुममध्ये बसून अशीही अनेक पालकांना शंका येत आहे. तसेच, दहावीची शाळा सुरू झाली अनेक वेळा नेट वर्क चा प्रोब्लेम झाला..त्यामुळे तो भाग त्या मुलांचा बुडाला.

तसेच, असाही अनुभव आहे की काही मुले ऑनलाईन पण छान बसत आहेत. त्यांना मध्येमध्ये ब्रेक दिला जातो. काही मुले कंटाळत आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन शाळा घेणे खूपच अवघड होवू शकते. ज्या गावात नेटवर्क नीट नाही येत, अनेक वेळा लाईट जातात त्याठिकाणी ऑनलाईन शाळा कशी काय प्रभावी होवू शकेल? मी ऑनलाईन शिक्षणाच्या विरोधी नाही, पण मुले शालेय जावून आपल्या मित्रांसोबत शिक्षकासोबत राहून जे शिक्षण घेतात ते खरे शिक्षण. तिथे एक वातावरण असते.

मुलांना शाळा आणि घर हे दोन्ही वेगळे भासते. आज घरातून च शाळा भरवली गेली आहे. शेवटी प्रत्यक्ष शाळेत जावून शिकणे आणि ऑनलाईन शिकणे यात फरक राहणारच आहे. व्यक्ती समाजशील प्राणी आहे. व्यक्तीला सहवासाची गरज असते. आज काळाची गरज म्हणून तात्पुरती सोय म्हणून ऑनलाईन शाळा हा पर्याय स्वीकारावा लागणार आहे यात शंका नाही. पण, त्यात येणारे अडथळे मात्र अगणित असणार आहे याचे दाखल घेणे गरजेचे आहे. तसेच, यामध्ये अनेक शिक्षक, रिक्षा काका, बस ड्रायव्हर मामा व मावशी यांच्या उदरनिर्वाहाच काय? आदी नानाविध प्रश्न उभे राहणार आहेत. ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे काही प्रश्न सुटणार असले तरी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.