धक्कादायक ! …म्हणून उपचारास कोविड रुग्णालयाचा नकार, वेळेत उपचार न मिळाल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. परिणामी अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. अशातच EMRI 108 रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुजरातमधून समोर आली आहे.

इंद्राणी बॅनर्जी असे कोरोनामुळे निधन झालेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. एका वृत्तानुसार, गेल्या दोन दिवसांपासून बॅनर्जी यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. शुक्रवारी त्यांना गांधीनगरच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले होते. पण यावेळी रुग्णालयात जागा शिल्लक नव्हती. त्यामुळे बॅनर्जी यांनी सहकाऱ्यांना गांधीनगरमधील खासगी रुग्णालयात नेण्याची विनंती केली.

खासगी रुग्णालयानेही आपल्याकडे व्हेंटिलेटर तसेच इतर सुविधा नसल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवारी विद्यार्थ्यांनी बॅनर्जी यांना खासगी वाहनातून अहमदाबाद पालिकेच्या कोविड रुग्णालयात घेऊन गेले. पण यावेळी रुग्णालयाने EMRI 108 रुग्णवाहिकेतून आणले नसल्याचे सांगत उपचारास नकार दिला. त्यानंतर त्यांना पुन्हा गांधीनगरमधील रुग्णालयात आणण्यात आले. पण तोपर्यंत ऑक्सिजनची पातळी खूपच खालावली होती. पहाटे 2 वाजता रुग्णालयाने ऑक्सिजन मशीनची व्यवस्था केली तोपर्यंत उशीर झाल्याचे त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.