पदव्या जाळल्यानंतर प्राध्यापकाचा आत्महत्येचा इशारा

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन – पुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून टाकण्याच्या निर्णयाचे पत्र मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे.

सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमधील सूरज माळी या प्राध्यापकानी थकीत पगाराबाबत विचारणा केली असता, त्याना योग्य न्याय मिळाला नाही, म्हणून त्यांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळली होती. त्याचा व्हीडीओ देखील नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्राध्यापकाने जीवन संपवून टाकत आल्याचे पत्र लिहिले आहे. अचकपणे कामावरुन कमी करण्यात आले, तसेच थकित पगारही संस्थेने दिला नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही संस्थेतील संबंधितांनी दखल घेतली नाही, त्यामुळे आता जीवन संपवित आहे, असे माळी यांनी पत्रात लिहिले आहे.

सूरज माळी हे सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजिनीयरींगमध्ये प्राध्यापक आहेत. थकीत पगार मागितल्याने या महाविद्यालय प्रशासनाने त्यांना पगार देण्यास नकार दिला. काम करणं हा गुन्हा असेल आणि पगार मागितला म्हणून कामावरून काढलं जात असेल तर आजवर मिळवलेल्या पदव्या आणि प्रमाणपत्रे हवेत कशाला? अशा शब्दांत संताप व्यक्त करत माळी यांनी घरातच गॅस पेटवून त्यावर एकएक करत पदव्या जाळल्या. सिंहगडमधील शिक्षकांना बँक कर्जही देत नाही. त्यामुळे माझा कामावरचा विश्वास उडाल्याचंही माळी यांनी सांगितलं. माळी यांनी पदव्या जाळत असल्याचा एक व्हिडिओही तयार करुन तो सर्वत्र व्हायरल केला होता.