भोसरी रूग्णालयाच्या खासगीकरणा विरोधात निषेध मोर्चा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी रूग्णालयाच्या खासगीकरणाच्या विरोधात भाजपाच्याच पक्षातले नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भोसरीत स्थानिक नागरीकांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

भोसरी रूग्णालयावर कोट्यावधी रूपये खर्च केला, इमारत उभी करून ते एका ठेकेदाराच्या घशात घालण्यासाठी खासगीकरणास मान्यता दिली. त्यामुळे त्या रूग्णालयाचा खासगीकरणाचा ठराव रद्द करावा या मागणीसाठी जन आक्रोशात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संखेने स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते.

पदव्युतर वैद्यकीय संस्था सुरु झाल्यामुळे दोन तीन वर्षात महापालिकेस वेगवेगळ्या वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर महापालिकेस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेचा दर्जा उंचावणार आहे. परंतू, भोसरी रुग्णालय खाजगी तत्वावर देण्याचे काहीही प्रयोजन उरत नाही. तरीही खाजगीकरणाच्या विषयाला पालिका महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. शहरातल्या लाखों गोरगरीब जनता , होणाऱ्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रास्त दरात उपलब्ध होण्यास मूकणार आहे. यामुळे नागरीकांमध्ये खाजगीकरणाला मंजूरी विरोधात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि भविष्यासाठी घातक ठरणारा आहे. खासगीकरणानंतरही ते चालवण्यासाठी वर्षाला २० कोटी रुपये मोजणे म्हणजे महापालिकेचा उरफाटा कारभार आहे. गोरगरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करून त्या माध्यमातून खासगी डॉक्टरांचे चांगभले करण्याच्या या प्रकाराला माझा तीव्र विरोध असल्याचे भाजपचे नगरसेवक रवि लांडगे यांनी यावेळी सांगितले.

रुग्णालय खासगीकरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करायचा होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे आपणाला ही संधी मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय खासगीकरणाच्या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.