कोथरुड परिसरातील सराईत गुंडांची टोळी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरुडमधील ४ सराईत गुंडांच्या टोळीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी दिले आहेत.

सुरज दशरथ पायगुडे (वय २१ ) (टोळीप्रमुख), आकाश मारुती बेलावडे ( वय २२, रा. जय भवानी नगर, कोथरुड), सिध्दांत उर्फ सिध्दार्थ संजय मराठे (वय २०, कोथरुड), अजिंक्य अरुण वाशीवाले (वय २५, रा. कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत.

चौघेही कोथरुड परिसरातील सराईत गुंड असून त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यांची परिसरात दहशत असल्याने त्याच्याविरोधात तक्रार करण्यास नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान चौघांपैकी कोणीही तडीपारीच्या काळात या परिसरांमध्ये दिसून आल्यास याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.