ED च्या कार्यालयात आज शरद पवार जाणार, राष्ट्रवादीची निदर्शने, पोलिसांचा जमावबंदीचा आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केल्याने आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच आक्रमक झाले असून ईडीच्या चुकीच्या कारवाईचा पूर्णपणे राजकीय लाभ उठविण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ते स्वत:च ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली चौकशी करा अशी मागणी करणार आहे.

यावेळी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस निर्दशने करणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. आज दुपारी २ वाजता शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक आणि बेलार्ड इस्टेट या ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांनी आज सकाळपासून पोलीस बंदोबस्त लावला आहे.

शरद पवार यांच्या या पावित्र्यामुळे ईडीचे अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येऊ नये, आम्ही तुम्हाला चौकशीला बोलावू त्याचवेळी यावे, असे सांगण्याचा प्रयत्न ईडीने सुरु केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस करणार निदर्शने –

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना येऊ नये, असे आवाहन केले आहे. आमदार जितेंद्र आढाव यांनी पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना साहेब आज माफ करा असे म्हणत कार्यकर्ते निदर्शने करणार असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष तपास पथकाकडून तपास सुरु होता. असे असताना ईडीने सोमवारी अचानक शरद पवार तसेच अजित पवार यांच्यासह ७० नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (मनी लॉड्रिंग) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिखर बँकेसह कोणत्याही बँकेचे संचालक नसताना शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने याबाबत सर्वांनीच आर्श्चय व्यक्त केले होते. त्यामुळे त्याचा राजकीय फायदा उठविण्यासाठी शरद पवार यांनी आज थेट स्वत: हून ईडी कार्यालयात जाऊन चौकशी करा, असे सांगणार आहे.

कडक बंदोबस्त –

या पूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी चौकशीसाठी ईडीने बोलावले होते. त्यावेळीही ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. तसाच बंदोबस्त आज ईडीच्या कार्यालयाबाहेर लावला आहे. या कार्यालयासमोरील रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आला असून या परिसरातील वाहतूक अन्य रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे.

Visit : policenama.com