मध्य प्रदेशातील प्रचाराचा ‘पुणेरी पॅटर्न’

ग्वालियर : वृत्तसंस्था – पुण्यातील पाट्या संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. कोणतीही भन्नाट पाटी किंवा पोस्टर्स बघितल्यानंतर सहाजिकच आपल्या डोळ्यासमोर पुणे पॅटर्न येतो. याच धर्तीवर मध्य प्रदेशातील ग्लालियर भागात भाजपाच्या समर्थकांकडून पुणेरी पद्धतीने हटके प्रचार करण्यात येत आहे. मुरैना जिल्ह्यामधील गावामध्ये लोकांच्या घराबाहेर लावलेले पोस्टर्स लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजप समर्थकांनी हे पोस्टर्स लोकांच्या घराबाहेर लावले आहेत.
रामगनगर क्षेत्रातील भाजपच्या चाहत्यांनी नरेंद्र मोदीच्या समर्थनार्थ हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरमध्ये ‘डोअर बेल खराब आहे, कृपया दरवाजा उघडण्यासाठी मोदी-मोदी ओरडा’ या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. अशा प्रकारचे पोस्टर्स रामनगरमधील अनेक घरांच्या बाहेर चिकटवण्यात आले आहेत. गिर्राज शर्मा या घरमालकाने सांगितले की, आमच्या घराची डोअर बेल खराब झाली होती.

त्यानंतर काहीतरी नवीन करण्याच विचार माझ्या डोक्यात आला. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अशा प्रकारचा मजकूर लिहून हे पोस्टर मी घराबाहेर लावले आहे. मात्र, यानंतर या पोस्टर्सचे लोण संपूर्ण रामनगर परिसरात पसरले. सध्या हे पोस्टर सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलं आहे.

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून आणि कार्य़कर्त्यांकडून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध शक्कल लढवल्या जातात. टीशर्ट, झेंडे, टोपी या प्रचार साहित्यासह अनेक माध्यमातून लोकांनी आपल्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अशा भन्नाट कल्पनांनी निवडणुकीच्या वातावरणात हास्यांचेरंग मात्र भरले जातात.