राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोबाईल हॅक करून केला अपप्रचार

इस्लामपूर (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोबाईल क्रमांक संगणक प्रणालीच्या सहाय्याने हॅक करुन सांगली लोकसभा मतदार संघात अपप्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . याबाबत जयंत पाटील यांनी सोमवारी रात्री इस्लामपूर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. कार्यकर्ते आणि मतदारांनी या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज जनार्दन पाटील यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली मतदारसंघात आज मतदान होत आहे. काल जयंत पाटील यांचा ९८२१२२२२२८ हा मोबाईल क्रमांक हॅक करून ‘आपणास विरोधी पक्षाचे गोपीचंद पडळकर यांना मदत करायची आहे,’ असा खोटा संदेश पसरविण्यात आला. अशा प्रकारचे फोन या मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना आल्याचे निदर्शनास आले. इस्लामपूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान घडलेल्या प्रकारचा निषेध करत कार्यकर्ते आणि मतदारांनी या खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पाटील यांनी केले आहे. सांगलीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर, भाजपचे संजय काका पाटील आणि आघाडीकडून (काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी) विशाल पाटील हे उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीने सांगलीत अगोदर जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी दिली होती, पण नंतर पडळकरांना ही उमेदवारी देण्यात आली. गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी भाजपला रामराम करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.