Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’चे धोरण अवलंबिले आहे. त्या अंतर्गत अभिलेखांचे संगणकीकरण, फेरफार प्रकियेत सुटसुटीतपणा आणि किमान मानवी हस्तक्षेप या तत्त्वांचा स्वीकार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड भूमिअभिलेख विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. यामुळे विभागाचे कामकाज गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. विशेष म्हणजे या सुविधेमुळे नागरिकांना आता घरबसल्या प्रॉपर्टी कार्ड पाहता येणार आहे. हे कार्ड सर्व शासकीय कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.

जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह गावठाण मिळून एकूण दोन लाख ३२ हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत. यातील सुमारे दोन लाख प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिजिटल स्वाक्षरी असलेले ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच दर निश्‍चित करून दिले आहेत. त्यानुसार शहरी भागातील मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डचे दर हे १३५ रुपये राहणार आहे. नगरपालिका हद्दीत ९०, तर ग्रामीण भागातील मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डाचे दर हे ४५ रुपये असणार आहेत. www.digitalsatabara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाइन प्रॉपर्टी कार्डचे काय आहे फायदे
– घरबसल्या प्रॉपर्टी ऑनलाइन मिळणार असल्याने नागरिकांना भूमापन कार्यालयात जाण्याची गरज नाही
– वेळेची, पैशांची होणार बचत
– प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा
– बनावट प्रॉपर्टी कार्डला आळा बसणार, फसवणूक टळणार