27 पानांची सुसाईड नोट लिहून प्रॉपर्टी डिलरनं गळफास घेऊन केली आत्महत्या

फतेहपुर : वृत्तसंस्था – आर्थिक तंगीमुळे एक प्रॉपर्टी डिलर इतका त्रासला होता की त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या मित्रांना घरी बोलावले होते, परंतु त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. 27 पानी सुसाईड नोटमध्ये प्रॉपर्टी डिलरने आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. ही दुर्दैवी घटना राजस्थानच्या फतेहपुर शेखावाटी येथील आहे.

शहरात बीकानेर रोडवरील कॉलनीतील घरात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. या तरूणाने 27 पानी सुसाईड नोट लिहून मृत्यूला स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक उदय सिंह यादव घटनास्थळी पोहचले. कुटुंबिय आल्यानंतर मृतदेह खाली उतरवण्यात आला आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.

पोलीस निरीक्षक उदय सिंह यादव यांनी सांगितले की, बगडी येथे राहणारे शिवलाल रुहेला भाडेकराराने घर घेऊन फतेहपुर येथे राहात होते. ते प्रॉपर्टीचे काम करत होते. शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता शिवलालने आपल्या मित्रांना फोन केला आणि सायंकाळी घरी येण्यास सांगितले. यावर मित्र सायंकाळी शिवलालच्या घरी गेले असता त्याने दार उघडले नाही.

तेव्हा मित्रांनी दरवाजा तोडून पाहिले असता तो फासावर लटकत होता. माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे.

शिवलालने मृत्यूपूर्वी 27 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरलेले नाही आणि कुणालाही त्रास देऊ नये असे म्हटले आहे. तसेच आजार आणि आर्थिक तंगीचा उल्लेख केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.