थकबाकी न भरल्यानं माजी मंत्र्यासह माजी आमदाराची मालमत्ता जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – थकबाकी न भरणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने आयुक्त पी. शिवशंकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकी न भरलेल्यांची मालमत्ता थेट जप्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याशी संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामद्योग संघ, माजी आमदार रवी पाटील यांच्याशी संलग्न रेडिमेड दुकान, सोरेगाव परिसरातील सुभाष पाटील यांची मालमत्ता आणि सात रस्ता भागातील तडवळकर फिटनेस क्लब प्रा. लि. ची मालमत्ता जप्त केली आहे.

शहरातील काही मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दहा लाखांपेक्षा अधिक असणाऱ्या थकबाकीदारांची सुनावणी घेतली. त्यावेळी त्यांना थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. दुसरीकडे पाच ते दहा लाखांच्या मध्ये असणाऱ्या थकबाकीदारांची सुनावणी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी घेतली. त्यांनीही थकबाकीदारांना मुदतवाढ दिली आहे. वेळेत थकबाकी न भरल्यास त्यांचीसुद्धा मालमत्ता जप्त केली जाईल, असे लेंगरेकर यांनी सांगितलं.

थकबाकी भरावीच लागणार

उपायुक्त लेंगरेकर म्हणाले, मुदतीत थकबाकी न भरल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडील थकबाकीची माहिती घेऊन पगारपत्रकासोबत त्यांना येणेबाकी नसल्याचा दाखला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.