‘त्या’ चार नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव !

मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलनावर तोडगा : अभियंत्यावर बूट भिरकाविल्याचे प्रकरण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शहर अभियंत्यांवर बूट भिरकाव्ल्याच्या प्रकरणातील आरोपी असलेले शिनसेनेचे तीन व राष्ट्रवादीचे एक अशा चार नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविला आहे. सदर प्रस्तावाची प्रत मनपा कर्मचारी युनियनला देण्यात आली आहे. त्यानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शुक्रवारपासून महापालिकेचे कामकाज पूर्ववत सुरू होईल.

शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे, नगरसेविका कमल सप्रे, नगरसेविका रिटा भाकरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू पैलवान या चार नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात आला आहे. या नगरसेवकांनी असभ्य वर्तन केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, असा प्रस्ताव आयुक्तांच्या स्वाक्षरीने नगरविकास विभागाला पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्तावाची प्रत देण्यात आली.

तसेच फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. तोडगा निघाल्यानंतर उद्या शुक्रवारपासून सकाळी नियमितपणे महापालिकेचे कामकाज सुरू होईल तीन दिवसांची सुट्ट्या व तीन दिवसांचे काम बंद आंदोलन यामुळे तब्बल सहा दिवसांपासून महापालिकेचे कामकाज ठप्प होते. मनपा प्रशासन व कर्मचारी युनियन यांच्यात तोडगा निघाल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.