30 % रुग्णांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ ! वयोवृध्द पुरूषांमध्ये हिवाळ्यातील वारंवार मूत्रविसर्जन होणे म्हणजे प्रोस्टेटचा आजार असण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लाशिया (बीपीएच)अर्थात प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात होणारी वाढ ही हिवाळ्याच्या काळात वयस्कर पुरुषांमध्ये आढळणारी सामान्य अवस्था आहे. प्रोस्टेट वाढण्याच्या रूग्णांमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रात्री द्रवपदार्थांचे सेवन कमी करणे, जीवनशैलीतील बदल तथा औषधे घेऊन ही लक्षणे दूर करू शकतो.वयोवृध्द (६० वर्षांवरील) पुरुषांना सर्वाधिक जाणवणाऱ्या समस्यांपैकी एक म्हणजे प्रोस्टेटच्या आकारमानातील वाढ होय.

वीर्यस्खलनाच्या वेळी शुक्राणूंचे वहन करणारा स्राव प्रोस्टेट ग्रंथी निर्माण करते. या ग्रंथी मूत्रनलिकेच्या बाजूला असते. मूत्रनलिकेद्वारे मूत्र शरीराबाहेर टाकले जाते. जेव्हा एखाद्याला बेनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लाशियाचा (बीपीएच) त्रास होतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रोस्टेट ग्रंथी सामान्य आकारमानाहून मोठी झालेली आहे. त्यामुळे मूत्रनलिका पिळल्यासारखी होते आणि परिणामी मूत्राचा प्रवाह कमकुवत होतो व रात्री लघवीची भावना होऊन सतत झोपेतून जाग येत राहते.लघवीला सतत जावे लागणे किंवा घाईने जावे लागणे,रात्रीच्या वेळी लघवी लागणे आणि मूत्राशय पूर्णपणे रिकामे न करता येणे आदी लक्षणांकडे लक्ष ठेवा. दुर्दैवाने हवामान थंड झाले की लघवीसंदर्भातील लक्षणे अधिक तीव्र होतात आणि हिवाळ्यात प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचे प्रमाणही वाढते.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. सूरज लुणावत म्हणाले, हिवाळ्यात प्रोस्टेट वाढण्याच्या प्रमाणात वाढ होण्याचे कारण म्हणजे या दिवसांत आपल्याला घाम कमी येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील द्रवपदार्थ बाहेर टाकले जाण्याचे प्रमाण कमी होते. या प्रक्रियेत मूत्राची निर्मिती अधिक प्रमाणात होते. त्यामुळे हिवाळ्यात आपल्याला अधिक वेळा लघवीला जावे लागते. एरवी ही समस्या फारशी गंभीर नाही पण त्यावर वेळीच उपाय झाला नाही, तर त्याचा एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.”

ते पुढे म्हणाले, “ही समस्या जीवनशैलीतील थोडेफार बदल, औषधे किंवा अगदी शेवटला पर्याय म्हणजे ट्रान्सयुथरल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट (टीयूआरपी) ही शस्त्रक्रिया यांच्या मदतीने हाताळली जाते. तेव्हा सोनोग्राफी करवून घेऊन स्वत:ला तपासून घ्या आणि तुम्हाला कोणते उपचार अनुकूल आहेत हे ठरवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.”

तुम्हाला बीपीएचच्या लक्षणांपासून आराम हवा असेल, तर काही सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. “लघवी करताना मूत्राशय पूर्णपणे रिकामे होईल याची काळजी घ्या, कारण, त्यामुळे सतत लघवीला जाण्याची गरज कमी होईल. पुरुष चिंतेत किंवा तणावाखाली असतात,तेव्हा त्यांना वारंवार लघवीची भावना होते. तेव्हा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहून तसेच ध्यानधारणेसारख्या तणावमुक्तीच्या उपाययोजना करून तणाव कमी करा.संध्याकाळनंतर द्रवपदार्थांचे सेवन टाळा. रात्री कॅफिनयुक्त पेये किंवा मद्य घेणे टाळा, कारण, त्यामुळे तुमच्या मूत्राशयात दाह निर्माण होऊ शकतो आणि मूत्रपिंडे अधिक मूत्रनिर्मितीसाठी उत्तेजित होऊ शकतात, परिणामी रात्रीच्या वेळी लघवीची भावना वाढू शकते. ओटीपोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायाम करा. त्याचप्रमाणे हिवाळ्यात थंड हवामानामुळे वारंवार लघवीला जावे लावे लागत असल्याने गरम कपडे घालून स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.”